शासकीय निवासस्थानांचे वीज देयक राहतेय प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:42 PM2018-05-23T17:42:18+5:302018-05-23T17:42:18+5:30
निवासस्थान सोडत असताना आधी वीज देयक अदा केल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे, असा फतवा सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
वाशिम : बदली अथवा अन्य कारणांमुळे शासकीय निवासस्थान सोडताना प्रशासकीय विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी सदनिकेचे वीज देयक तसेच प्रलंबित ठेवतात. याकडे शासनाने लक्ष केंद्रीत केले असून यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. निवासस्थान सोडत असताना आधी वीज देयक अदा केल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना सादर करावे लागणार आहे, असा फतवा सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
यासंदर्भात २२ मे रोजी पारित झालेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे, की शासकीय निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणारे बहुतांश अधिकारी, कर्मचारी सदनिकेत वापर होणाºया विजेचे देयक अदा करित नाहीत. सदनिका सोडतानाही हे देयक तसेच प्रलंबित राहत असल्याने नव्याने वास्तव्य करण्यासाठी येणाºया अधिकारी, कर्मचाºयांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यापुढे मात्र शासकीय निवासस्थान सोडताना संबंधित सदनिकेस वीज पुरवठा करणाºया कंपनीकडून वीज देयक प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यालयाकडे सादर करावे. तसेच नव्याने कुणी वास्तव्यास येण्याच्या कालावधीपर्यंत सदनिकेचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत वीज कंपनीस कळविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागानेही शासकीय अधिकारी, कर्मचाºयाने त्यांच्या ताब्यातील सदनिकेचे वीज देयक थकीत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय निवासस्थानाचा ताबा घेण्याची कार्यवाही करू नये, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.