“मॉलमध्ये मद्यविक्रीसारखे निर्णय घेण्यापूर्वी सरकारने संभाव्य दुष्परिणामांचा विचार करावा”
By संतोष वानखडे | Published: October 2, 2022 05:18 PM2022-10-02T17:18:04+5:302022-10-02T17:20:40+5:30
शिरपूरमध्ये पालकमंत्री राठोड यांचे आगमन होताच, शिवसैनिकांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.
वाशिम - मॉलमध्ये मद्यविक्रीसारखे निर्णय घेण्यापूर्वी सरकारने या निर्णयामुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करावा, असा उपदेश आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांना रविवारी (दि. २ ऑक्टोबर) दिला. संजय राठोड यांनी रविवारी शिरपूरनगरीत जाऊन आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे दर्शन घेतले असता, ते बोलत होते.
शिरपूरमध्ये पालकमंत्री राठोड यांचे आगमन होताच, शिवसैनिकांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. राठोड यांनी पुरातन असलेल्या भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात जाऊन सर्वप्रथम अधरमूर्तीचे दर्शन घेतले. सिद्धांत सागर महाराज यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. नंतर आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. शिक्षणामध्ये मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर, शिरपूरच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
मॉलमध्ये मद्यविक्रीसारखे निर्णय घेण्यापूर्वी समाजावर त्याचे जे दुष्परिणाम होतात, त्यावर सरकारने विचार करावा असा उपदेशही आचार्यांनी पालकमंत्र्यांना दिला. यावेळी चातुर्मास समितीच्यावतीने चातुर्मास समिती मुख्य प्रवक्ता डॉ. अभय गुंगे, कार्याध्यक्ष जितेंद्र छाबडा, प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रशांत गडेकर, महामंत्री धनंजय रोकडे, मंत्री आकाश महाजन, निलेश उकळकर, आवास निवास व्यवस्था संजय विश्वंभर यांनी राठोड यांचा सत्कार केला.