शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:10+5:302021-08-17T04:47:10+5:30
वाशिम : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात शेतीसाठी ...
वाशिम : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात शेतीसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पद्मश्री नामदेव कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव यांची उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना काळातही कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अधिकाधिक सुविधा पुरवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न केले जाणार असून कोरोना काळातही जिल्ह्यातील विकास कामांना अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.
यावेळी पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना योद्धा म्हणून काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.