शासकीय रुग्णालयातील ‘फायर सिस्टीम’ गायब
By admin | Published: September 16, 2014 06:45 PM2014-09-16T18:45:10+5:302014-09-16T18:45:10+5:30
कारंजा तालुक्यातील चित्र : रूग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
कारंजालाड: कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातील हजारो रुग्णांवर उपचार केल्या जाणार्या कारंजा ग्रामीण रुग्णालयासह, कारंजा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणेच बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेविषयी किती दक्षता बाळगण्यात येते, हे स्पष्ट दिसत आहे.
कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात कारंजा तालुक्यासह मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. कारंजा ग्रामीण रुग्णालयात ३0 रुग्णांना दाखल क रून घेण्याची व्यवस्था आहे, तर बाहय़ रुग्ण विभागात दररोज किमान दोनशेहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयात शासकीय आणि निमशासकीय मिळून एकूण ६0 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय रूग्णांसह येणार्या नातेवाईकांची संख्या शंभरच्या आसपास असते.
कारंजा तालुक्यात धनज, उंबर्डा बाजार, पोहा, धामणी, मनभा ही पाच प्राथमिक आरोग्य कें द्र आहेत. यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी ६0 हून अधिक रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दररोज ५0 ते ६0 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. या सर्व रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात; परंतु या सर्व रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम उपाय म्हणून वापरली जाणारी आग प्रतिबंधक उपकरणेच बसविण्यात आलेली नाहीत. यापैकी एकाही रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इतर कुठलीही व्यवस्था किंवा उपकरण नाही. वर्षभरापूर्वी कारंजा ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात आग लागली होती. त्या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी, विविध साहित्य जळाल्यामुळे १५ ते २0 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेपासून बोध घेत रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसवायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. रुग्णांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी करून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे क ाम आरोग्य विभाग करीत असल्याचे त्यावरून दिसत आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी फायर ऑडिट करून आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे आदेश असताना कारंजा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
या सर्व रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसविण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.