आदर्श गाव योजनेतील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील - राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:10 PM2018-04-13T13:10:03+5:302018-04-13T13:10:03+5:30
वाशिम : आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरूवार, १२ एप्रिल रोजी कारंजा लाड तालुक्यातील धोत्रा जहांगीर येथे बोलताना सांगितले.
वाशिम : आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरूवार, १२ एप्रिल रोजी कारंजा लाड तालुक्यातील धोत्रा जहांगीर येथे बोलताना सांगितले. आदर्श गाव योजनेंतर्गत धोत्रा जहांगीर गावाची निवड करण्यात आली असून ना. प्रा. शिंदे यांनी या गावाला भेट देऊन गावात झालेल्या विकास कामांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, सरपंच शीलाताई पवार, उपसरपंच सुनील थोरात, डॉ. राजू काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. प्रा. शिंदे म्हणाले, आदर्श गाव योजनेतून धोत्रा जहांगीर येथे करण्यात येत असलेल्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांनी गावात होणारे प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जदार होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच गाव जलपूर्ण बनविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पावसाचा प्रत्येक थेंब गावाच्या शिवारात अडविण्यासाठी, जिरविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य वापर करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन ना. प्रा. शिंदे यांनी यावेळी केले. पायाभूत सुविधांमध्ये गाव स्वयंपूर्ण बनविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आदर्श गाव योजनेतून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत च्ई-लर्निंग अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या डिजिटल वर्ग खोल्यांची पाहणी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केली. पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये धोत्रा जहांगीर गावाने सहभाग घेतला आहे. या अंतर्गत गावातील मृद व जलसंधारणाच्या कामांची सुरुवात ना. प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.