शासकीय कामकाज ठप्प

By admin | Published: September 3, 2015 01:50 AM2015-09-03T01:50:39+5:302015-09-03T01:50:39+5:30

विविध विभागांचे कर्मचारी संपावर; बँकेच्या लाखोंच्या व्यवहारात व्यत्यय.

Government work jam | शासकीय कामकाज ठप्प

शासकीय कामकाज ठप्प

Next

वाशिम : कामगारांच्या केंद्रीय संघटनांनी २ सप्टेंबरला संपाची हाक दिली होती. या संपात वाशिम जिल्ह्यातील महसूल कर्मचारी तसेच दूरसंचार, बँक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, परिचारिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसह अन्य काही विभागांचे कर्मचारी सहभागी झाले. परिणामी, एका दिवसासाठी कामकाज ठप्प झाले. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. जवळपास २५00 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती आहे. अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेंशन योजना सर्वांंना लागू करावी, नोकर भरतीवरील निर्बंध कायमस्वरूपी हटविण्यात यावे, केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, सेवानवृत्तीचे वय ६0 वर्षे करण्यात यावे, ६0 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, सातवा वेतन आयोगाचे गठन राज्यामध्ये करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये प्रस्तावित बदल करू नये, सहाव्या वेतन आयोगामधील केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता, वाहन भत्ता त्वरित देण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हय़ातील सर्व कॅडरवाईज संघटना तसेच पेन्शनर असोसिएशन यांनी २ सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज पुर्णत: ठप्प होते. या संपाला पाठिंबा म्हणून नायब तहसीलदार व तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी काळ्या फिती लावून कामकाजासाठी कर्तव्यावर हजर होते. कर्मचारी उपस्थित नसल्याने कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना निवेदन सादर केले. दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात बर्‍याच प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला. या संपात विविध कर्मचारी संघटनेचे जवळपास २२00 कर्मचारी आणि बँक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, परिचारिका ५00 असे एकूण २७00 कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आहे.

Web Title: Government work jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.