शेंदुरजना आढावच्या सुपुत्राला शासनाचा 'केकी मूस' छायाचित्र पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:00 PM2019-08-01T16:00:08+5:302019-08-01T16:00:17+5:30
चंद्रकांत आढाव यांनी छायाचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत शासनाचा महत्त्वपूर्ण शासकीय गटातील केकी मूस पुरस्कार पटकावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना आढाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी आणि माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात कार्यरत असलेले चंद्रकांत आढाव यांनी छायाचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत शासनाचा महत्त्वपूर्ण शासकीय गटातील केकी मूस पुरस्कार पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मंगरुळपीर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि जंगलाने वेढलेल्या भागात असलेल्या शेंदुरजना आढाव येथे आनंदराव आणि लिलाबाई आढाव या दाम्पत्याच्या घरी चंद्रकांत आढाव यांचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच चंद्रकांत आढाव यांना इतरांपेक्षा वेगळे कार्य करण्याची आवड होती. त्यांना छायाचित्रणाचा छंदही होता. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण आणि शिक्षणही घेत अकोला शहर गाठले. अंगी असलेली कला आणि पात्रतेच्या जोरावर त्यांना माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात नोकरी मिळाली. त्यानंतर सतत परिश्रम करीत त्यांनी या विभागात असाधारण कामगिरी करीत आपली छाप पाडली. या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळेच शासनाने त्यांची शासकीय गटातील मानाच्या केकी मूस छायाचित्र पुरस्कारासाठी निवड केली. का दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे हे यश शेंदुरजान आढाव आणि वाशिम जिल्ह्यासाठी गर्वाची बाब ठरली आहे.