हप्ते, वेतनासाठी शासनाकडे निधी नाही; शिक्षकांकडून एक रुपयाची मनिऑर्डर!
By संतोष वानखडे | Published: November 10, 2022 06:02 PM2022-11-10T18:02:03+5:302022-11-10T18:03:40+5:30
काळ्या फिती लावून आंदोलन : शासकीय धोरणाचा निषेध
वाशिम (संतोष वानखडे) : इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तिन्ही हप्ते मिळाले, दिवाळीपूर्वी वेतनही झाले; परंतू जिल्हा परिषद शिक्षकांना ना थकीत हप्ते मिळाले ना दिवाळीपूर्वी वेतन झाले. या धोरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षकांनी १० नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले. शासनाकडे प्रतिकात्मक मदत म्हणून एक रुपया मनिऑर्डर पाठवून शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केला.
ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यासंबंधाने महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे शिक्षक वगळता सर्व संवर्गिय कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतनाकरिता अल्प अनुदान दिल्यामुळे महाराष्ट्रात २५ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी होऊ शकले नाही. नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू होऊनही कमी असणाऱ्या अनुदानासाठी आवश्यक तरतुदींचा पत्ता नाही, असा आरोप करीत शिक्षक समितीच्या शिक्षकांनी १० नोव्हेंबर रोजी शाळेत काळ्या फिती लावून कामकाज करीत शासन धोरणाचा निषेध नोंदविला.
आंदोलन जाहीर करून प्रतिकात्मक मदत १ रुपया शासनाकडे पाठविण्यास सुरुवात झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून वेतन विषयाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या ‘व्हीसी’ सुरू झाल्या, पत्रव्यवहार सुरु केला. मात्र, जबाबदारीची चालढकल सुरू असल्याने काही शिक्षकांना अजूनही वेतनाची प्रतीक्षा कायम आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणीही शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"