ग्रा.पं. निवडणुकीत ३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:49+5:302021-01-13T05:43:49+5:30
कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात ...
कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ७०० मतदान केंद्रे असून एका केंद्रावर प्रत्येकी चार अधिकारी, कर्मचारी व अतिरिक्त २०० अधिकारी, कर्मचारी असे एकूण ३ हजार जणांची कोरोना चाचणी ९ जानेवारीपासून केली जात आहे. रविवारपर्यंत १,४०० जणांची चाचणी करण्यात आली.
००००
१३ जानेवारीपर्यंत उमेदवारांची चाचणी
जिल्ह्यातील २५२ सदस्य अविरोध झाल्याने उर्वरित १,२३५ जागांसाठी निवडणूक होत आहे. १,२३५ जागांसाठी ३,२२६ उमेदवार नशीब आजमावत असून, या उमेदवारांनी १० ते १३ जानेवारीपर्यंत कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांनी कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे गरजेचे आहे.
०००
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणार काळजी
मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. उमेदवार व मतदान केंद्रातील प्रतिनिधींनीदेखील कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मतदानाच्या दिवशी केंद्रात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या मतदाराला मतदान करता यावे म्हणून पीपीइ किट व आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरच सर्वात शेवटी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.