वाशिम तालुक्यातील ग्रा.पं. निकालात अनेकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:59+5:302021-01-19T04:40:59+5:30
वाशिम तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी राेजी झाली. या निवडणुकीची मतमाेजणी वाशिम येथील बसस्थानकनजीक काेराेनेशन हाॅल येथे झाली. ...
वाशिम तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी राेजी झाली. या निवडणुकीची मतमाेजणी वाशिम येथील बसस्थानकनजीक काेराेनेशन हाॅल येथे झाली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. सहा ग्रामपंचायती अविराेध झाल्यानंतर १९ ग्रामपंचायतींसाठी १७३ उमेदवार निवडून द्यायचे हाेते. याकरिता शेकडाे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चांगलीच रंगत रंगली हाेती. आज निकालाच्या दिवशी अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या हातून सत्ता गेली असून, नव्यांना मतदारांनी संधी दिल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता कायम ठेवल्याचे दिसून आले. अनेक दिग्गजानांनाही फटका बसल्याचे निकालात दिसून आले. वाशिम तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत अनसिंग येथे जगदीश राजे व चिंतामणी लांडगे यांनी १७ पैकी १५ जागांवर विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी पांडुरंग ठाकरे यांच्या गटाला केवळ दाेन जागेवरच समाधान मानावे लागले. तसेच अडाेळी येथील ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आदर्श युवा पॅनलला ११ पैकी ७ जागा मिळविण्यात यश आले. उकळीपेन येथे तर महाविकास आघाडीने ११ पैकी ११ जागेवर विजय प्राप्त केला, तर कंझरा येथे सुद्धा शिवसेनेच्या वतीने सात पैकी सात जागांवर विजय मिळविला.
..................
अनसिंग येथे दिग्गजांना हादरा
वाशिम तालुक्यातील सर्वांत माेठी समजली जाणारी ग्रामपंचायत अनसिंग येथे दिग्गज राजकारणी म्हणून समजल्या जाणाऱ्या पांडुरंग ठाकरे यांना १७ पैकी केवळ दाेनच जागांवर विजय प्राप्त करता आला. अनसिंग येथील जगदीश राजे व चिंतामणी लांडगे यांच्या पॅनलने १७ पैकी १५ जागांवर विजय प्राप्त केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाशिम येथे गुलाल उधळून एकच जल्लाेष केल्याचे दिसून आले.
..............
कंझरा येथे शिवसेनेला सातही जागेवर विजय
वाशिम तालुक्यातील कंझरा येथील ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेने सात पैकी सात ही जागेवर विजय प्राप्त केला, तर उकळीपेन येथील ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने ११ पैकी ११ जागेवर विजय प्राप्त केला. यावेळी विजय प्राप्त केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी वाशिम येथील मतमाेजणी केंद्रानजीक जल्लाेष केला.