प्रशासकांनी पदभार स्विकारला; खातेबदल अर्ध्यावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:16 PM2020-09-23T12:16:15+5:302020-09-23T12:16:25+5:30
तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासकांची डिजिटल स्वाक्षरी व सचिवांचे संयुक्त बँक खात्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही.
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये सप्टेंबर महिन्यापासून प्रशासकराज सुरू झाला. दुसरीकडे आर्थिक व्यवहारांसाठी या ग्राम पंचायतींमध्ये तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासकांची डिजिटल स्वाक्षरी व सचिवांचे संयुक्त बँक खात्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही.
जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू झाले. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पशुसंवर्धन अधिकारी आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू झाले असून, आर्थिक व्यवहारासाठी प्रशासक व ग्रामसचिव यांच्या नावाने संयुक्त बँक खाते बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालिन सरपंचाऐवजी प्रशासक व ग्रामसचिवांची डिजिटल स्वाक्षरी घेऊन संयुक्त बँक खाते बनविले जात असल्याने या प्रक्रियेस विलंब होत असल्याने प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत ८० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये खातेबदल झाला असून, उर्वरीत ग्राम पंचायतींमध्येदेखील लवकरच खाते बदल होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)