Gram Panchayat Election : ४६८ उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:29 PM2020-12-25T13:29:59+5:302020-12-25T13:30:08+5:30
Gram Panchayat Election: ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केल्यामुळे २०१५ मधील ग्रामपंचायत निवडणूकीत ५००पेक्षा अधिक उमेदवार अपात्र ठरून निवडणुकीतून बाद झाले होते. गत पाच वर्षांत त्यातील काही मयत झाले; तर उर्वरित ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये ५००पेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. निवडणूक विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधितांनी निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर केला नाही. परिणामी, निवडणूक विभागाकडून कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. यादरम्यान काहीजण मयत झाले असून, एकूण ४६८ जणांचा कार्यवाही होणाऱ्यांमध्ये समावेश होता. त्यापैकी २३४ लोकांच्या प्रकरणावरील सुनावण्या २०१७मध्ये पूर्ण झाल्या. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी करण्यात आली आहे; तर उर्वरित २३४ लोकांच्या सुनावण्या अद्याप प्रलंबित आहेत.
असे असले तरी दोषी आढळलेल्या संबंधितांपैकी कुणीची यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास पात्र ठरविण्यात आलेले नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)