अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:38 IST2021-01-11T12:38:15+5:302021-01-11T12:38:40+5:30
Gram Panchayat Election: नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे.

अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, काही ठिकाणी नात्या-गोत्यातच लढती होत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनसिंग येथे सख्खे मावस भाऊ, तर सोहळ (ता. कारंजा) येथे सख्ख्या चुलत जावांमध्ये लढत होत आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींमधील लढती लक्षवेधक ठरत आहे. काही ठिकाणी नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे. वाकद (ता.रिसोड) येथे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये भावकीमध्ये लढत होत असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी अमोल प्रदीपराव देशमुख व धनंजय भगवानराव देशमुख यांच्यात चुरशीची लढत होत आहे. वाइगाैळ (ता.मानोरा) येथे माजी जि.प. सदस्य हरिश्चंद्र राठोड, उपसरपंच जयसिंग राठोड हे सख्खे दोन भाऊ व त्यांची सून कविता राठोड हे एकाच कुटुबांतील तीन जण एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. कवठा , अनसिंग, सोहळ येथेही नात्यागोत्यातील उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
काकूविरूद्ध पुतण्या
रिसोड तालुक्यातील कवठा येथील ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होत आहे. वाॅर्ड क्रमांक एकमध्ये काकूविरूद्ध पुतण्या अशी लढत आहे. रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरीमकर या कवठा गावातील रहिवासी आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शारदा तुळशीराम हरिमकर (काकू) यांच्याविरोधात अनिल पुंजाजी हरिमकर (पुतण्या) उभे आहेत.