Gram Panchayat Election : निवडणूक चिन्हांमध्ये फळ, भाजी, चार्जर अन् माउस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 10:37 AM2021-01-02T10:37:23+5:302021-01-02T10:45:29+5:30
Gram Panchayat Election: भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवारांकडून विविध स्वरूपांतील चिन्हांची मागणी केली जाते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. त्यात भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे.
जिल्ह्यात यंदा १६२ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक असून, छाननी प्रक्रियेनंतर ४ हजार २५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असून, चिन्ह वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आवडीप्रमाणे चिन्ह घेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होत असे. हा प्रश्न आता निवडणूक आयोगाने निकाली काढला असून पूर्वीच्या १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे ठेवले जाणार आहेत. त्याची यादी निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
अशी आहेत चिन्हे!
वाढलेल्या ४० निवडणूक चिन्हांमध्ये संगणकाचा माउस, संगणक, एयर कंडिशनर, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा, हेडफोन, लाइटर, मोबाइल चार्जर, डिश अँटेंना, टीव्हीचा रिमोट, पेन ड्राइव्ह, इंजेक्शन, स्वीच बोर्ड अशी डिजिटल साधने यांसह
हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आद्रक, हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला.
वाढलेल्या ४० चिन्हांची यादी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडे पाठविण्यात आलेली आहे. एका मतपत्रिकेवर एकच चिन्ह पुन्हा येणार नाही, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिलेला आहे. त्याचे पालन केले जाणार आहे. तसेच कुठल्याही उमेदवारास चिन्ह मागण्याचा अधिकार नाही; पण समन्वयातून तहसीलदारांशी संपर्क साधून ही अडचण दूर होऊ शकते.
- सुनील विंचनकर, जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम