Gram Panchayat Election : निवडणूक प्रचारासाठी उरले अवघे चार दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:34 AM2021-01-10T11:34:44+5:302021-01-10T11:34:50+5:30
Gram Panchayat Election: प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे चार दिवस उरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ज्वर चांगलाच चढला असून, ३ हजार २२६ उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे चार दिवस उरले आहेत.
१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात १४८७ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. परिणामी प्रत्यक्षात आता १४८७ जागांसाठी तीन हजार २२६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहे. काही ठिकाणी माेठ्या प्रमाणात युवक रिंगणात उतरलेले दिसून येत आहे. शेलूबाजार येथे गत निवडणुकीतील एकही सदस्य यंदाच्या निवडणुकीत उतरलेला दिसून येत नाही. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. प्रचार संपण्यास चार दिवस बाकी असल्याने प्रशासकीय पातळीवर मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी निवडणूक विभाग करत असून, कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
निवडणूक हाेणाऱ्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. त्यामुळे १५२ ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १९, रिसाेड तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २८, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २७ व मानाेरा तालुकयातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येथील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध
४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. यात ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्या. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५, रिसाेड तालुक्यातील २, मालेगाव तालुक्यातील २, कारंजा तालुक्यातील १ व मानाेरा तालुक्यातील १ ग्रामपंचायतचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव, कोंडाळा झामरे, सावरगाव जिरे, भोयता, किनखेडा या सर्वाधिक ग्रा.पं. आहेत.