Gram Panchayat Election Results : नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:07 PM2021-01-19T12:07:50+5:302021-01-19T12:07:57+5:30
Gram Panchayat Election Results : ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना नाकारत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय सहा केंद्रांत मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालाने अनेक दिग्गजांना हादरा देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. काही दिग्गजांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढत ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली.
या दिग्गजांच्या पॅनलचा पराभव
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या पॅनलला चिखली गावात नऊ पैकी तीन जागेवर समाधान मानावे लागले. शिरपूर येथे जि.प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, चिवरा येथे आमदार अमित झनक यांचे खंदे समर्थक सुरेश शिंदे, अनसिंग येथे जि.प. सदस्य पांडुरंग ठाकरे, धामणी मानोरा येथे माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे, इंझोरी येथे जि.प. सदस्य विनाताई जयस्वाल, वाईगौळ येथे शिवसेना संपर्कप्रमुख भोला राठोड, कुपटा येथे पंचायत समिती माजी उपसभापती अब्दुल बशीर, तळप बु.येथे भाजपचे नेते नीलकंठ पाटील, कोंडोली येथे बाजार समिती माजी सभापती अशोकराव देशमुख यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.
या दिग्गजांच्या पॅनलचा विजय
मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांचे काका पंडितराव झनक यांच्या गटाने नऊ पैकी नऊ जागा पटकावित प्रतिस्पर्धी गटाचा धुव्वा उडविला. चिखली येथे जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक यांच्या पॅनलने नऊ पैकी सहा जागा पटकावत सत्तांतर घडवून आणले. वाकद येथे माजी जि.प. सदस्य रावसाहेब देशमुख व जि.प. सदस्य सुजाता देशमुख, सवड येथे माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन लाटे, कवठा येथे पं.स. सभापती गीता संजय हरिमकर, पळसखेडा येथे पं.स. उपसभापती सुभाष खरात, कंकरवाडी येथे माजी जि.प. सभापती विश्वनाथ सानप, शेलूबाजार येथे सुरेशचंद्र कर्नावट, काटा येथे माजी पं.स. सभापती वीरेंद्र देशमुख, शिरपूर येथे अशोक अंभोरे, मेडशी येथे शेख गणीभाई, वसारी येथे जि.प. सदस्य बेबीताई इंगोले आदींच्या गटाचा विजय झाला.