Gram Panchayat Election : ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 05:44 PM2020-12-27T17:44:48+5:302020-12-27T17:51:33+5:30
Gram Panchayat Election News : तांत्रिक अडचणी येत असल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत.
वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरताना ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अभाव, लिंक ओपन न होणे यासह अन्य तांत्रिक अडचणी येत असल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण चांगलेच तापले असून, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली. अगोदर आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाच्या प्रती तहसिल कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. आॅनलाईन अर्ज भरताना नेट कनेक्टिव्हिटी, लिंक ओपन न होणे आदी समस्या उद्भवत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी एक, दोन तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.