ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्ष भेटी, मौखिक प्रचारालाच प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:27+5:302021-01-13T05:44:27+5:30
वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पार ...
वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पार पडली. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी झाली, ४ जानेवारीला नामनिर्देशन मागे घेण्याची आणि चिन्हवाटपाची प्रक्रिया पार पडली, तर ११ ग्रामपंचायती अंशत बिनविरोध झाल्याने आता १५२ ग्रामपंचायतींमधील ४८६ प्रभागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रचाराला वेग आला आहे. तथापि, प्रभागाचे क्षेत्र मर्यादित असल्याने उमेदवारांकडून प्रत्यक्ष मतदार भेटी आणि मौखिक प्रचारावरच भर दिला जात आहे. यात विविध पॅनलच्या उमेदवारांचा जोर अधिक आहे. लोकप्रतिनिधी आणि जि.प., पं.स.मधील पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
-------
ध्वनिक्षेपकाची गरज भासेना
ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागाचे क्षेत्र आणि मतदारांची संख्या इतर निवडणुकीच्या तुलनेत कमी असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे उमेदवारांना शक्य होत आहे. त्यामुळे या प्रकारच्या प्रचारावरच अधिक भर दिला जात असून, या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक किंवा वाहनांचा आधार घेण्याची गरज उमेदवारांना भासत नसल्याचे दिसून येत आहे.
-----------
अपक्षांचे एकला चलो रे
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्ष आणि पॅनलमधील उमेदवारांना आमदार, खासदार, जि.प., पं.स. पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याने त्यांना प्रचारकार्यात आघाडी घेणे शक्य होत आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवारांकडे तेवढे पाठबळ नसल्याने आपल्या मोजक्या समर्थकांच्या साथीने अपक्ष उमेदवार घरोघर भेटी देऊन प्रचार करीत असल्याचे दिसत आहे.