ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची लागणार कसोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:37 PM2017-09-17T19:37:22+5:302017-09-17T19:41:30+5:30
वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालिम असून, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत पोहोचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही आपली शक्ती दाखविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाने व्यूहरचना आखली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच भाजपा समर्थित कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विविध आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भाजपा नेत्यांचे कसब पणाला लागणार आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांना त्या दृष्टिने नियोजन करावे लागणार आहे. शिवसैनिक तथा समर्थकांच्या हाती अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता सोपविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांना विशेष कसरत करावी लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिक तथा समर्थकांना बसणार नाही, याची दक्षता शिवसेनेच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे.
ग्रामीण भागातील सत्ता टिकविण्याबरोबरच जनाधार वाढविण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता आपल्या समर्थकांच्या हाती सोपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील मैदानात उतरावे लागणार आहे. त्या दृष्टिने माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांच्यासह राकाँ नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत घवघवीत यश मिळविणाºया भारिप-बमसंलादेखील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समर्थक व कार्यकर्त्यांना विविध आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक ग्रामपंचायतींच्या सत्तेत बसविण्यासाठी जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांना फिल्डिंग लावावी लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील ‘राजकारण’ ढवळून निघत असून पक्षाच्या नेत्यांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपणार असून, ग्रामपंचायत निवडणुक ही रंगीत तालिम ठरत आहे.
दरम्यान, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली असून, २२ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. १६ सप्टेंबरपर्यंत सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.