ग्रामपंचायत कर्मचा-यांचे धरणे
By Admin | Published: August 2, 2016 01:45 AM2016-08-02T01:45:37+5:302016-08-02T01:45:37+5:30
४९१ ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचा समावेश : विविध मागण्यांसाठी आंदोलन.
वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देत आहे. अद्याप अनेक मागण्या प्रलंबित असल्याने याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातही ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्यांनी धरणे दिले. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांना ग्रॅच्युएटी नियम लागू करण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचार्यांना सन १ जानेवारी २000 पासून किमान वेतन लागू केले असून, दर ५ वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करावयास पाहिजे होते. ग्रामपंचायत कर्मचार्यांचा वेतनासाठी सुधारित किमान वेतनाची अधिसूचना जाहीर करण्यात यावी, ग्राम पंचायतीच्या सेवाकाळात ग्राम पंचायत कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसाला ग्राम पंचायतीचे सेवेत नियुक्ती देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्यांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची ग्राम पंचायत स्तरावर काटेकोर अंमलबजावणी व्हावी, ग्राम पंचायत कर्मचार्यांना डॉ.दीपक म्हैसकर यांच्या पेन्शन समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या, तसेच ग्राम पंचायत कर्मचार्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा करण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्यांची आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २000 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत कर्मचार्यांच्या आकृती बंधात सुधारणा करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी धरणे देण्यात आले.