ग्राम पंचायत क्षेत्रात उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची पूर्वतयारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:30 PM2018-07-10T14:30:39+5:302018-07-10T14:31:58+5:30
वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम पंचायतीबरोबरच ग्रामपंचायतचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणातदेखील स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम पंचायतीबरोबरच ग्रामपंचायतचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणातदेखील स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करण्याचा कालावधी असून, १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
ग्रामिण भागातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ या वर्षापासून ग्राम पंचायतमधील वार्ड, प्रभाग आणि जि.प. गणाला सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या अभियानांतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय पुरस्कार सुधारित शासन निर्णयानुसार बंद करण्यात आला आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार पुर्वीप्रमाणेचे आहेत. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.
सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करावी लागणार आहे. यानंतर १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले.