सभेच्या उपस्थितीसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या खिशाला झळ
By admin | Published: May 6, 2017 01:37 AM2017-05-06T01:37:24+5:302017-05-06T01:37:24+5:30
गट ग्रामपंचाय सदस्यांना भुर्दंड; मानधनापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक.
शिरपूर जैन (जि. वाशिम): ग्रामपंचायत सदस्य अतिशय तुटपुंजे मानधनावर कार्य करत असताना, ग्रामपंचायतीच्या सभेसाठी गटग्रामपंचायतमधील सदस्यांना गावातून उपस्थित राहण्यासाठी येणार्या प्रवासाचा खर्चच दुप्पट लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत सदस्य सभेसाठी उपस्थित राहण्यास उत्सूक नसल्याचे दिसते.
अमरावती विभागात एकूण ३ हजार ९५६ ग्रामपंचायती असून त्यामधील गटग्रामपंचायतीचा आकडादेखील मोठा आहे. अशा गटग्रामपंचायती अंतर्गत येणार्या गावांतील सदस्यांना ग्रामसभा, मासिक सभा, विशेष सभा आदिंसाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवासा करता यावे लागते. काही ग्रामपंचायतीमधील दोन गावांचे अंतर ७ किलोमीटरपेक्षाजास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात येण्यासाठी अशा ठिकाणच्या सदस्यांना वाहनाचा आधार घ्यावा लागतो. साधारण १५ रुपये प्रवासभाड्या प्रमाणे सदस्यांना किमान ३0 रुपयांसह इतर खर्च करावा लागतो. त्यांचे मासिक मानधन केवळ २५ रुपये असताना, त्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी शिलकीचा जो खर्च येतो. तो ग्रामपंचायत सदस्यांना खिशातून करावा लागत असल्याने चित्र आहे. सदस्यांच्या आवश्यक उपस्थितीअभावी अनेकदा ग्रामपंचायतींच्या सभा तहकूबही कराव्या लागतात. त्यामुळे पुन्हा सभेचे आयोजन केल्यानंतर आधी उपस्थित असलेल्या सदस्यांना नाहक भूर्दंंड बसतो.
वाशिम जिल्ह्यातील शेलगाव बगाडे या गटग्रामपंचायत अंतर्गत शेलगाव खवणे आणि दापुरी खुर्द ही दोन गावेही येतात. या दोन गावांतील सदस्यांना ग्रामपंचायतीच्या सभेसाठी शेलगाव बगाडे येथे जावे लागते. यातील शेलगाव खवणेच्या सदस्यांना परिसरातील शिरपूर जैनमार्गे शेलगाव बगाडे येथे पोहचावे लागते. यासाठी शिरपूरपर्यंंत १0 रुपये आणि शिरपूर ते शेलगाव बगाडेपर्यंंत १0 रूपये असा २0 रुपये खर्च येतो. अर्थात त्यांना ४0 रुपये खर्च एका सभेचा येतो. ग्रामपंचायत सदस्यांना २0१२-१३ पर्यंंत मासिक मानधन म्हणून केवळ १0 रुपये मिळत असत. शासनाने २0१४-१५मध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन अर्थात मासिक मानधन १00 रुपये केले होतो; परंतु गतवर्षीपासून ते कमी करून २५ रुपये करण्यात आले, हे विशेष.
आम्हाला शेलगाव खवणे येथून शेलगाव बगाडे येथे सभेसाठी येण्याजाण्याचा खर्च ४0 रुपये येतो, तर मासिक मानधन केवळ २५ रुपये मिळते. यामुळे आम्हाला सभेसाठी उपस्थित राहण्याचा खर्च खिशातून करावा लागतो. शासनाने याचा विचार करून मानधन वाढवायला हवे.
-अशोक आनंदा राऊत
ग्रामपंचायत सदस्य, शेलगाव बगाडे