शिरपूर विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायत ठराव, नाहरकतीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 02:16 PM2018-09-29T14:16:38+5:302018-09-29T14:16:58+5:30
शिरपूर जैन: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम जवळपास पूर्ण झाली असून, आता विकास आराखड्याला मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव, स्थळदर्शक नकाशा आणि नाहरकत प्रमाणपत्रच अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम खोळंबले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्या अभियंत्यांनी ग्रामपंचायतला पत्र सादर करून उपरोक्त प्रक्रि या पूूर्ण करण्याची सुचना केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यासाठी आवश्यक असलेली अतिक्रमण हटाव मोहिम मागील महिन्यापासून वेगात राबविण्यात आली. आता या तीर्थक्षेत्राचा १५ कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना वाशिम जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. या संदर्भातील जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतर सदर आराखड्यात रिसोड/मालेगावचे आमदार अमित झनक यांनी कपात सुचनाही मांडली असून, त्याची प्रत ग्रामपंचायतला बांधकाम विभागाने पाठविली आहे. आमदार झनक यांनी या संदर्भात २५ मे २०१८ रोजी मालेगाव विश्रामभवनातील बैठकीत आराखड्यासाठी प्रस्तावित केलेली प्राधान्यक्रम यादीही ग्रामपंचायतला पाठविण्यात आली असून, यानुसार ग्रामपंचायतचा ठराव, स्थळदर्शक नकाशा व नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावकडे सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तथापि, अद्यापही ग्रामपंचायतने ही कार्यवाही पूर्ण केलेली नाही.