शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:28+5:302021-07-11T04:27:28+5:30
वाशिम : शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी ...
वाशिम : शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी जि.प. शिक्षण विभागाची तयारी असली तरी, ग्रामपंचायत आणि पालकांच्या एनओसीनंतरच या शाळा सुरू होऊ शकणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही; मात्र, आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.
................
जिल्ह्यातील एकूण गावे : ७८९
जिल्ह्यातील एकूण शाळा
शासकीय : ७७३
अनुदानित : १८४
कायम विनाअनुदानित : ४२२
.................
कोरोनामुक्त असलेली गावे : ६५५
..................
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
वाशिम - १०९
रिसोड - ६७
मालेगाव - ८७
मंगरुळपीर - ९९
मानोरा - १३२
कारंजा -१६०
...............
बॉक्स : अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही
जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असून, ९ जुलैच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ १२९ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सहाही तालुक्यात प्रत्येकी २२ ते २५ पाच रुग्ण आहेत. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या ठरावाची आवश्यकता असली तरी जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविल्याची माहिती नाही.
...........
बॉक्स : पालकांची हा...
मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे, तर घरच्या घरी राहून मुलांचीसुद्धा चिडचिड वाढली आहे. आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, शाळा सुरू झाल्यास आम्ही पाल्यांना शाळेत पाठवू.
- अजय जयस्वाल, पालक
.................
कोट : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून, सर्व व्यवहारही सुरळीत सुरू आहेत. अशा वेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुलेही घरच्या घरी राहून त्रस्त झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवू.
- जगदीश आरेकर, पालक
...............
शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव आणि पालकांची एनओसी मागितली जात आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येतील.
- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
....................
४३६ शाळा आहेत सज्ज
- नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
- इयता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार असून, त्यासाठी ४३६ शाळा सज्ज आहेत.
- शालेय परिसर, वर्गखोल्यांची साफसफाई आणि इतर सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत.