जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदांसाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:25+5:302021-02-11T04:42:25+5:30
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ ...
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरुळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंच पदासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी व विरोधकांकडे केवळ एका जागेचा फरक असल्याने आणि बहुमत असणाऱ्यांकडे सरपंच पदासाठी इच्छुकांची मोठी यादी असल्याने ऐनवेळी चमत्कारीक निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत गावाची सत्ता आपल्या हाती यावी म्हणून विरोधकांकडून विविध फंडे अवलंबिले जात असल्याचे दिसून येते. इच्छुकांना सरपंच पदाची ऑफर देत सत्ताधाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्यासाठी विरोधकही सरसावल्याने चुरस निर्माण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. काही ठिकाणी नवोदितांनी बाजी मारल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये काही जुने, काही नवे, काही ज्येष्ठ असे सरमिसळ सदस्य निवडून आले आहेत. सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, कुणाला वेटींगवर ठेवले जाणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००
बॉक्स
सरपंच, उपसरपंचपदाचे आश्वासन
बहुमत असणाऱ्या पॅनलमधील इच्छुकांना हेरून त्यांना सरपंच, उपसरपंच पदाची खुली ऑफर प्रतिस्पर्धी पॅनल प्रमुखांकडून दिली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात निवडून आलेल्या पॅनेलमधील सदस्य फुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेच्या दिवशी काही गावांमध्ये मोठा पोलीस ताफा लागण्याची शक्यता आहे. एकूणच सत्ता स्थापन होईपर्यंत गावातील राजकारण चांगलेच तापणार आहे.