ग्रामपंचायतींमध्ये केवळ १७ टक्के ज्येष्ठांना मतदारांनी दिली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:34+5:302021-01-20T04:39:34+5:30
गावपातळीवर ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी चुरशीच्या लढती होतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकादेखील चुरशीच्या झाल्या. अलीकडच्या काळात युवावर्ग मोठ्या संख्येने ग्रामपंचायत ...
गावपातळीवर ग्रामपंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी चुरशीच्या लढती होतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकादेखील चुरशीच्या झाल्या. अलीकडच्या काळात युवावर्ग मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुकीत उतरत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सदस्यही ग्रामपंचायतच्या सभागृहात असावे म्हणून मतदारही ज्येष्ठ सदस्यांना पसंती देत असल्याचे दिसून येते. परंतु, हे प्रमाण युवा सदस्यांच्या तुलनेत नगण्यच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील जवळपास १९ टक्के ज्येष्ठ उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ज्येष्ठ सदस्यही सरपंचपदी विराजमान होऊ शकतात, असा अंदाज आहे.
००
रिसोड तालुक्यात सर्वाधिक उमेदवार
रिसोड तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या २९२ जागांसाठी निवडणूक झाली. अन्य तालुक्याच्या तुलनेत रिसोड तालुक्यात ज्येष्ठ उमेदवार जास्त संख्येने निवडून आल्याचे दिसून येते. त्या खालोखाल वाशिम तालुक्यातील मतदारांनी ज्येष्ठ उमेदवारांना पसंती दिल्याचे दिसून येते.
००००
मतदारांनी गावाचा विकास करण्याची संधी म्हणून निवडून दिले आहे. मतदारांचा विश्वास सार्थ ठरवीत गावातील प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावून विकास कामाला प्राधान्य राहील.
- रमेश अवचार,
ग्रामपंचायत सदस्य
०००
गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच विकासात्मक कामे करण्याचा मानस आहे. मतदारांनी जो विश्वास टाकला, त्याला तडा जाऊ न देता विकासकामे केली जातील.
- अशोकराव देशमुख,
ग्रामपंचायत सदस्य
००००००
गावाचा विकास साधण्यासाठी शासन स्तरावरून ग्रामपंचायतींना निधी पुरविला जातो. गाव विकासाला प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील.
- विठ्ठल ढोरे,
ग्रामपंचायत सदस्य
०००
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती १५२
निवडून आलेले उमेदवार १,२३३
विजयी ज्येष्ठ नागरिक २३४