पांगराबंदीत ४० वर्षांत प्रथमच झाली खुल्या मैदानात ग्रामसभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:14 PM2018-09-01T18:14:19+5:302018-09-01T18:14:28+5:30
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे चित्र ४० वर्षांत पहिल्यांदाच बदलून शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी खुल्या मैदानात ग्रामसभा यशस्वीरित्या पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : चोहोबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी या गावात गेल्या ४० वर्षांपासून गावकऱ्यांचा विशेष सहभाग न ठेवता चार भिंतीच्या आत ग्रामसभा घेतली जायची. अनेकवेळा कोरमअभावी ती बारगळली देखील. परिणामी, विकासात्मकदृष्ट्या ना चर्चा व्हायची; ना ठराव घेतले जायचे. यामुळे गावाच्या विकासाला बहुतांशी खीळ बसली होती. दरम्यान, माजी सैनिक संतोष गर्जे यांचा पुढाकार आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे चित्र ४० वर्षांत पहिल्यांदाच बदलून शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी खुल्या मैदानात ग्रामसभा यशस्वीरित्या पार पडली.
पांगराबंदी हे गाव संपूर्ण वाशिम जिल्ह्याला परिचित आहे. राजकीयदृष्ट्या देखील या गावाला, ग्रामपंचायतीला तद्वतच जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कललाही आगळेवेगळे महत्व प्राप्त आहे. असे असले तरी पांगराबंदी ग्रामपंचायतीअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसभेच्या माध्यमातून विकासकामांबाबत चर्चा होत नव्हती. विकासकामांचे कुठलेही विशेष ठराव घेतले जात नव्हते. ही बाब लक्षात घेवून तथा गावकºयांमध्ये जनजागृती करून शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत सचिवांना विविध स्वरूपातील ठराव घेण्यास भाग पाडले, अशी माहिती संतोष गर्जे यांनी दिली.
या ग्रामसभेत गावातील दारूबंदी, संत गजानन महाराज मंदिराला सभागृह बांधणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे, मच्छिमार सहकारी संस्थेस गावातील धरणाचा ठेका देणे, गावातील अंतर्गत रस्त्यांचा सर्वांगीण विकास करणे, वैयक्तिक शौचालय निर्माण कार्यक्रम राबविणे, आदी ठरावांचा समावेश आहे.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोरखनाथ खंडारे होते. सभेचे कामकाज सचिव भराटे यांनी पाहिले. यावेळी उपरपंच पार्वतीबाई सांगळे, माजी सैनिक संतोष गर्जे,
सदस्य संजय गावकर, गोपाल चव्हाण, जनार्दन घुगे, प्रदिप घुगे, पंजाबराव घुगे,तेजराव आंधळे, केशव वाघमारे, दिलीप घुले, बच्चू गंगावणे, चंदेराव घुगे, जीवन खेडकर, रामचंद्र आडे, हरिश्चंद्र चव्हाण, सारंग खंडारे, अरूण खंडारे, गणेश चव्हाण, लखन घुले यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
पांगराबंदी ग्रामपंचायतीअंतर्गत नियमानुसार यापूर्वीही ग्रामसभा घेतल्या गेल्या. मात्र, त्याचे स्वरूप तुलनेने मोठे नव्हते. ३१ आॅगस्टला आयोजित ग्रामसभेत घरकुल यादीचे वाचन आणि आक्षेपासंबंधी चर्चा करण्यात आली. त्यामुळे त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले.
- संदिप कोटकर,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव