ग्रामसेवकांच्या वेळा ठरल्या; गैरहजर राहिल्यास होणार कारवाई
By संतोष वानखडे | Published: February 26, 2024 02:46 PM2024-02-26T14:46:43+5:302024-02-26T14:47:32+5:30
सोमवार, बुधवार, शुक्रवारी ग्रामपंचायतीत : मंगळवार, गुरूवारी आढावा बैठका
संतोष वानखडे
वाशिम : ग्रामपंचायत स्तरावरील कामकामात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्यालयीन वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने आखून दिले आहे. या वेळापत्रकानुसार हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. काही ग्रामसेवकांकडे एका तर काहींकडे दोन, तीन ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कधी व कोणत्या वेळी उपस्थित राहतील, याबाबत संबंधित गावातील नागरिक अनभिज्ञ असतात. अनेकठिकाणी ग्रामसेवकांच्या शोधात नागरिकांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. आता यापुढे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत व आढावा सभेबाबतचे वेळापत्रकच जाहिर केले. त्यानुसार यापुढे दर आठवड्यात केवळ मंगळवार व गुरूवार या दोन दिवशी सर्व स्तरावरील आढावा बैठका होतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेऊ नये, असे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले. सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांना सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले. मंगळवार व गुरूवारी आढावा सभा किंवा इतर वरिष्ठ कार्यालयाबाबतचे कामकाज नसल्यास आवश्यकतेनुसार व कामाच्या व्यापानुसार त्या ग्रामपंचायतीमध्ये हजर राहावे, असे निर्देशही सीईओ वैभव वाघमारे यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले.
दर्शनी भागात फलक लावणे अनिवार्य
ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात साडेचार फुट बाय तीन फुट या आकारात ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहण्याबाबतच्या वेळापत्रकाचे फलक लावणे अनिवार्य करण्यात आले. फलक लावण्यासाठी १ मार्च २०२४ पर्यंत मुदत दिली असून,फलक लावण्याचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. १ मार्चपूर्वी फलक न लावणाऱ्या ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.