भित्तीफलकाद्वारे विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:01 PM2019-02-08T16:01:04+5:302019-02-08T16:01:19+5:30
पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर गावकºयांनाही भाषेचा वापर करणे सोपे होऊ लागले आहे.
शालेय शिक्षणात दहावीपर्यंत व्याकरणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्याकरणाच्या माहितीशिवाय विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होऊ शकत नाही. तथापि, शिक्षणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांना व्याकरणाचे ज्ञान म्हणावे तसे मिळत नाही. त्यातच अभ्यास करताना पाठांतरावर अधिक भर द्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होताना दिसत नाही. पार्डी ताड येथील गोविंद विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण राऊत यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना ही अडचण येऊ नये म्हणून अफलातून आणि स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. त्यांनी स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर इंग्रजी आणि मराठी व्याकरणाची माहिती देणारे फलक रंगविले आहेत. यात विभक्तीचे प्रत्यय, संधी, विग्रह, समास, अलंकार आदिंचे स्पष्ट शब्दांतील रकाने त्यांनी मांडले आहेत. स्वत:च्या शालेय जिवनात व्याकरणाचा वापर करताना आलेल्या अडचणींपासून त्यांनी बोध घेतला आणि ही समस्या इतरांना येऊ नये म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गावातील विद्यार्थी हसत, खेळत व्याकरण शिकू लागले असून, याचा फायदा गावकºयांनाही होत आहे. बाळकृष्ण राऊत यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे प्रभावित झालेल्या महिला ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कारही केला आहे.