संपत्तीचा वाद, नातवानेच केला आजी-आजोबांचा घात; तीन मित्रांच्या मदतीने दोघांची हत्या!
By नंदकिशोर नारे | Published: August 8, 2024 05:17 PM2024-08-08T17:17:23+5:302024-08-08T17:17:43+5:30
चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
नंदकिशोर नारे, वाशिम : संपत्तीच्या वादातून नातवानेच तीन मित्रांच्या मदतीने आजी आणि आजोबांची हत्या करून त्यांना नदीपात्रात फेकून दिले. ही धक्कादायक घटना मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची माहिती ७ ऑगस्टला मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या घटनेचा तपास करून आरोपी प्रतीक संतोष वीर याच्यासह त्याच्या तीन आरोपी मित्रांना अटक केली आहे.
मानोरा तालुक्यातील इंझोरीनजीक अडाण नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची फिर्याद तोरणाळा येथील पोलिस पाटील हरिदास प्रल्हाद राऊत यांनी ६ ऑगस्ट रोजी मानोरा पाेलिसात दिली होती. यावरून मानोराचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, हा मृतदेह सोमठाणा येथील प्रल्हाद दत्तराम वीर (७५ वर्षे) यांचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून संशयित आरोपी प्रतीक संतोष वीर याला मंगरुळपीर येथून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपत्तीच्या वादातून मित्रांच्या मदतीने सोमठाणा येथील मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावरील एका इमारतीत ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता आजोबा आणि आजी निर्मला प्रल्हाद वीर यांची हत्या करून दोघांचेही मृतदेह इंझोरीनजीकच्या पुलावरून अडाण नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी प्रतीक संतोष वीर, जीवन फाळके, जगदीश अनिल देवकर व विकास भगत यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली.
एक किलोमीटर अंतरावर आढळला निर्मला वीर यांचा मृतदेह
आरोपी प्रतीक वीर याने मित्रांच्या मदतीने आजोबा प्रल्हाद वीर व आजी निर्मला वीर यांची ४ ऑगस्ट रोजी हत्या करून त्यांना अडाण नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली होती. त्यावरून पोलिसांनी निर्मला वीर यांचा मृतदेह शोधण्यासाठी पिंजर येथील आपत्कालीन पथकाला पाचारण केले. या पथकाने पुलापासून १ किलोमीटर अंतरावर निर्मला वीर यांचा मृतदेह शोधून काढला.
मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आजोबांच्याच वाहनाचा वापर
आरोपी प्रतीक वीर याने ४ ऑगस्ट रोजी मित्रांच्या मदतीने आजोबा प्रल्हाद वीर आणि आजी निर्मला वीर यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आजोबा प्रल्हाद वीर यांच्याच वाहनाचा वापर केल्याचेही पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत सांगितले.