ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:47+5:302021-07-14T04:45:47+5:30
ड्रॅगन फ्रुट हे एक निवडुंग परिवारातील महत्त्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि ...
ड्रॅगन फ्रुट हे एक निवडुंग परिवारातील महत्त्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अँटिऑक्सिडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. याव्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात तसेच या पिकाला रोग व किडीचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठांमध्ये या फळाची व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यात क्षमता, औषधी व पोषक आदी बाबी लक्षात घेऊन सन २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अनुदान मिळावे याकरीता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.
००००
असे राहील अनुदान
ड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण या बाबीकरिता अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी चार लाख प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्क्यांप्रमाणे एक लाख ६० हजार रुपये अनुदान तीन वर्षात ६०:२०:२० या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.