बीज प्रक्रिया संयंत्रासाठी मिळणार १० लाख रुपयांचे अनुदान; वाशिम जिल्ह्याला केवळ एक लक्ष्यांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 04:02 PM2018-02-27T16:02:05+5:302018-02-27T16:02:05+5:30
वाशिम : कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती, समृद्ध शेतकारी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संयंत्रासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
वाशिम : कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती, समृद्ध शेतकारी मोहिमेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संयंत्रासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला १० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याला केवळ एक बीज प्रक्रिया संयंत्राचा लक्ष्यांक प्राप्त असून, पात्र लाभार्थींनी ५ मार्च २०१८ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.
शेतीला जोडधंदा म्हणून शासनातर्फे शेतकरी उत्पादक संघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला काही अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक संघ हे मोठ्या संख्येने बीज प्रक्रिया उद्योगाकडे वळत असल्याने शासनातर्फे बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाते. सन २०१७-१८ या वर्षात वाशिम जिल्ह्याला केवळ एक लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे. इच्छूक शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनीची संख्या आणि लक्ष्यांक लक्षात घेता स्पर्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. १० लाख रुपये अनुदान किंवा बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. उर्वरीत खर्च हा शेतकरी उत्पादक संघ किंवा उत्पादक कंपनीला करावा लागणार आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून शेतकरी उत्पादक संघ अथवा शेतकरी उत्पादक कंपनीला बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागणार आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनी सदर अनुदानास पात्र राहणार आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक संघ अथवा शेतकरी उत्पादक कंपनीने संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ५ मार्च २०१८ पर्यंत अर्ज सादर करावा. लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ७ मार्च २०१८ रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी सांगितले.