आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गतचे अनुदान प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:53 PM2020-11-21T16:53:06+5:302020-11-21T16:53:36+5:30
Washim News या योजनेंतर्गत जिल्ह्यात गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव आले असून, चालू वर्षातील अनुदान रखडले आहे. या प्रस्तावावरून आंतरजातीय विवाहास पालकांचा विरोध कायम असल्याचे दिसून येते.
सामाजिक समतेचा संदेश, आंतरजातीय विवाहास होणारा विरोध कमी करणे यासह आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी म्हणावे तसे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त होत नसल्याचे दिसून येते. गत तीन वर्षात केवळ ५४ प्रस्ताव प्राप्त झाले. चालू वर्षात जवळपास चार प्रस्ताव आले असून, याचे अनुदान बाकी आहे. गतवर्षी २२ प्रस्ताव आले होते. या सर्वांचे अनुदान देण्यात आले.
५० हजाराचे सहाय्य
या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला ५० हजाराचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गतचे अनुदान शासनस्तरावरून नियमित विहित मुदतीत प्राप्त होत नाही. जिल्ह्यात चालू वर्षात चार प्रस्ताव असून, अद्याप अनुदान प्राप्त झाले नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पात्र प्रस्तावाला अनुदान दिले जाणार आहे.
याेजनेचा लाभ कोणाला?
या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येत होते. अनु. जाती, जमाती यापैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तिशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. अनुदानासाठी ते अर्ज करू शकतात.