भगिरथ प्रयत्न: ग्रामस्थांसाठी शेतातील पाणी आणले गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:35 PM2019-02-22T15:35:59+5:302019-02-22T15:36:50+5:30
माजी ग्रामसेवक पी. के. चोपडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात असलेल्या विहिरीचे पाणी पाईपने गावात आणले.
भर जहागीरच्या चोपडे यांची समाजसेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहागीर(वाशिम): रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला असून, ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी माजी ग्रामसेवक पी. के. चोपडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात असलेल्या विहिरीचे पाणी पाईपने गावात आणले. स्वखर्चाने पाईपद्वारे गावातील विहिरीत पाणी टाकून ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.
रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ रखरखत्या उन्हात पायपीट करीत असल्याचे दिसत आहे. यात भर जहागीरचाही समावेश असून, या ठिकाणी पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. रात्रीबेरात्री शिवारातील विहिरीवरून पाणी आणून गरजा भागविल्या जात आहेत. पाण्यावाचून ग्रामस्थांचे सुरू असलेले हाल पाहून पी. के. चोपडे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी गावापर्यंत आणण्याचे ठरविले. त्यासाठी ६५ हजार रुपये खर्च करून ७ हजार फुट पाईप खरेदी केला आणि मोटरपंपद्वारे शेतातील विहिरीचे पाणी गावातील विहिरीत सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावकºयांची पाणीटंचाईची समस्या मिटल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रिसोड तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र
गतवर्षीच्या पावसाळ्यात रिसोड तालुक्यात खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांसह बहुतांश प्रकल्पही कोरडे पडून भुजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यात अपुºया पाण्यामुळे कृषी उत्पादनातही घट झाली असून, गुरांच्या चारापाण्यासह रोजगाराची समस्या गंभीर झाली आहे. पाणीटंचाई तीव्र झाल्यामुळे रिसोड शहरातील नागरिक टँकर विकत घेऊन तहान भागवित आहेत.
जलस्वराजच्या योजना निष्फळ
ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी शासनाच्यावतीने जलस्वराज योजना राबविल्या जात आहेत. गावागावांतील विहिरीवर मोटारपंप बसवून नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत आहेत. तथापि, जलस्वराज्य विहिरी कोरड्या पडल्याने या योजना निष्फळ ठरत आहेत. भर जहागीर येथील विहिरीतही ठणठणाट असल्याने येथील जलस्वराजची योजना बंद पडली असून, गावकरी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.