महापुरुषांनी समाजाला न्याय मिळवून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:19+5:302021-09-02T05:29:19+5:30

वाशिम : वर्षानुवर्षे अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, जातीपातीची बंधने, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीच्या बंधनात अडकलेल्या बहुजन समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी ...

Great men brought justice to the society | महापुरुषांनी समाजाला न्याय मिळवून दिला

महापुरुषांनी समाजाला न्याय मिळवून दिला

Next

वाशिम : वर्षानुवर्षे अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, जातीपातीची बंधने, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीच्या बंधनात अडकलेल्या बहुजन समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक आदी महापुरुषांनी संघर्ष केला असून, त्यांनी विषमतेवर कडाडून प्रहार करत समाजाला अन्याय, अत्याचाराच्या बंदिवासातून मुक्त केले, असे प्रतिपादन परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांनी केले. स्थानिक चतुर्थश्रेणी कॉलनीमध्ये २९ ऑगस्ट रोजी विदिशा महिला मंडळाच्या आयोजनातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात उमरा शमशोद्दीन येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुद्देशीय संस्थेच्या कलावंतांनी महापुरुषांच्या जीवनावर आधारित बहारदार असा गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य सादर केला. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व अभिवादन करण्यात आले. गीतगायन कार्यक्रमात संस्था अध्यक्ष शाहीर लोडजी भगत, कविगायक सुरेश शृंगारे, शाहीर दत्ता वानखडे, गायक सिद्धार्थ भगत आदी कलावंतांनी वामनदादांनी गायीलेली गीते सादर केली. संस्थेच्यावतीने सर्व सहभागी कलावंतांचा मेश्राम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुरेश शृंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विदिशा महिला मंडळाच्या अध्यक्ष यशोदा वानखडे, सल्लागार मथुराबाई वानखडे, सचिव वैशाली वानखडे यांच्यासह परिसरातील महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Great men brought justice to the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.