शहरात चार ठिकाणी होणार ‘ग्रीन झोन’
By admin | Published: June 13, 2017 12:50 AM2017-06-13T00:50:41+5:302017-06-13T00:50:41+5:30
पहिल्या टप्प्यात ९७ लक्ष रुपयांची निघणार निविदा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहराला हिरवा शालू पांघरण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असून, पहिल्या टप्प्यात शहरात चार ठिकाणी ‘ग्रीन झोन’ तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ९७ लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होण्यासोबतच तापमानात वाढ झाली आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात ‘ग्रीन झोन’ तयार करण्याची गरज आहे. शहरातील वाढते नागरिकीकरण वृक्षांच्या मुळावर उठले आहे. नागरिकांकडून बेसुमार वृक्षतोड होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीसाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. जीवाची लाही करणाऱ्या गर्मीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शहरात वृक्ष लागवड करणे हाच एकमेव उपाय असून, त्या दिशेने मनपा प्रशासनाने पावले उचलली आहेत. ‘अमृत’योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्षलागवड करून ‘ग्रीन झोन’तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, पहिल्या टप्प्यात २०१५-१६ करिता शहरात चार ठिकाणी ‘ग्रीन झोन’ तयार करण्यासाठी ९७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीने २०१५-१६ करिता प्रकल्प अहवाल तयार केला असता त्यामध्ये शहरातील चार जागांचा समावेश करण्यात आला. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, हिरवळ निर्माण करून मोठ्या वृक्षांसह शोभिवंत झाडांची लागवड करण्याचा समावेश आहे. याकरिता लवकरच प्रशासन निविदा प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती आहे.
‘धु्रव’ने तयार केला प्रकल्प अहवाल
‘ग्रीन झोन’च्या माध्यमातून शहरात वृक्ष लागवड होऊन नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुणे येथील ‘धु्रव’नामक एजन्सीकडे सोपविण्यात आले. सदर एजन्सीची थेट शासन स्तरावरून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील उद्याने, बगिच्यांसह मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या शहरातील ओपन स्पेस, शासकीय जागांवर वृक्ष लागवड केली जाणार आहे.
या जागांचा आहे समावेश
प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या गोरक्षण रोड भागातील व्हीएचबी कॉलनी येथील जलकुंभाचा परिसर, आदर्श कॉलनीस्थित मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १६ चे मैदान, नायगाव येथील क ब्रस्तान परिसर, मोहता मिल परिसरातील कब्रस्तान परिसराचा समावेश आहे.
--