शेतकऱ्यांनी धरली भुईमूग शेतीची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:51+5:302021-06-01T04:30:51+5:30
शेलूबाजार : नांदखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने भुईमूग शेतीकडे वळले असून, यंदा ३०० ते ३५० एकरावर भुईमुगाचा पेरा ...
शेलूबाजार : नांदखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने भुईमूग शेतीकडे वळले असून, यंदा ३०० ते ३५० एकरावर भुईमुगाचा पेरा होता. सर्वाधिक भुईमूग उत्पन्न घेणाऱ्या बटईदारांचा सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाच्यावतीने रविवारी सत्कार करण्यात आला.
नांदखेडा येथील सिंचन तलावामुळे मे महिन्यातसुध्दा शेतशिवार हिरवागार शालू पांघरून असल्याचे दिसून येते. माजी सरपंच लक्ष्मणराव जायभाये यांनी दूरदृष्टीकोनातून उभारलेला सिंचन तलाव गावाच्या प्रगतीची भाग्यरेखा ठरला आहे. यावर्षी नांदखेडा गावात ३०० ते ३५० एकरावर भुईमूग पेरा होता. दर महिन्याला बदलणाऱ्या वातावरणामुळे भुईमूग उत्पादनात घट झाल्याचे जिल्हाभरात पाहावयाला मिळते. याही गावात सरासरी उत्पादनात घट आली आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील शेतकरी पांडुरंग जायभाये यांचे बटईदार मुस्तकिन शहा, विनोद जामभाये, नीलेश जायभाये या तरुणांनी पाण्याच्या पाळीचे योग्य नियोजन, रात्रीची फवारणी, कल्पकतेने डवरा पास लावून भर घालणे व तणमुक्त शेती या प्रयत्नातून जिद्द, मेहनत, चिकाटी, कल्पकता व प्रामाणिक प्रयत्न याच पंचसुत्राने नैसर्गिक संकटावरसुध्दा मात करून २० एकरात सरासरी १३ ते १५.५ क्विंटल उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भुईमूग पिकाला पेरणी ते काढणीपर्यंत एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्या बटईदारांच्या मेहनतीचा कुठेतरी सन्मान व्हावा, याच सद्हेतूने नांदखेडा येथील सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाचे अध्यक्ष जावेद शहा जमील शहा या युवकांच्या कल्पनेतून बटईदारांचा सत्कार ही आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शेख जिल्हानी होते, तर प्रमुख अतिथी सरपंच सचिन जायभाये, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर जायभाये, ग्रामपंचायत सदस्य शेख अकील, प्रा. गौतम सिरसाठ, शेख अनिस, निवास घुगे, हामिद खान, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ लठाड, पांडुरंग जायभाये, आशिद खान, शेख इरफान, सादीक शहा हे होते. जावेद शहा यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन जायभाये यांनी आभार मानले.