भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 05:33 PM2019-06-02T17:33:50+5:302019-06-02T17:33:56+5:30
वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींची पाहणी करून भूजल पातळीची सद्य:स्थिती नोंदविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट झाल्याचे माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.एस. कडू यांनी दिली.
वर्षभरातून चारवेळा निरीक्षण विहिरींची पाहणी करून भूजल पातळीची स्थिती तपासण्यात येते. त्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून या मोहिमेस सुरूवात करण्यात आली होती. दरम्यान, ७९ निरीक्षण विहिरींपैकी वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले. यासह मालेगाव तालुक्यातील ८ विहिरींच्या पाहणी १.३५ मीटर, रिसोड तालुक्यातील १८ विहिरींच्या पाहणीत १.७ मीटर, मंगरूळपीर तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत ०.८२ मीटर, मानोरा तालुक्यातील १५ विहिरींच्या पाहणीत १.२२ मीटर; तर कारंजा तालुक्यातील १६ निरीक्षण विहिरींच्या पाहणीत भूजल पातळीत सरासरी ०.९२ मीटरने घट झाल्याचे आढळून आले, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्वच तालुके ‘मायनस’मध्ये
जिल्ह्यातील सर्वच गावांमधील जलस्त्रोतांच्या पातळीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सिंचन प्रकल्पांसह बहुतांश विहिरी, हातपंप, कुपनलिकांनी तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून निरीक्षण विहिरींच्या पाहणीत भूजल पातळीच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वच तालुके ‘मायनस’मध्ये गेले असून मालेगाव तालुका ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे दिसून येत आहे.