पांगरखेड्यात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: April 10, 2017 01:39 PM2017-04-10T13:39:38+5:302017-04-10T13:39:38+5:30
पुनर्वसित पांगरखेडा येथे सार्वजनिक पाणी व्यवस्था निर्माण केली नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शिरपूर जैन (वाशिम) : मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपूर येथील ई क्लास जमिनीवर करण्यात आले. २००७-०८ पासून पुनर्वसित पांगरखेडा येथे सार्वजनिक पाणी व्यवस्था निर्माण केली नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शिरपूरपासून ४ किमी अंतर असलेल्या पांगरखेडा गाव हे मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. या गावचे पुनर्वसन २००७-०८ मध्ये शिरपूरपासून एक ते दिड किमी अंतरावर असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले. अत्यावश्यक असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठयासाठी जलकुंभ बांधण्यात आला व पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाईप लाईन व जलकुंभामध्ये लागणाऱ्या पाण्यासाठी कुठलीही विहीर, तलाव अशी सुविधा निर्माण केली नाही. पाण्याची पातळी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खोल गेली. वैयक्तिक बोअरवेल आटले आहेत. परिणामत: पांगरखेडवासीयांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरवरुन पाणी आणावे लागत आहे.