सामुहिक विवाह सोहळय़ाचे प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित

By admin | Published: August 6, 2016 02:09 AM2016-08-06T02:09:02+5:302016-08-06T02:09:02+5:30

पश्‍चिम व-हाडातील स्थिती; सहभागी लाभार्थी अनुदानापासून वंचित

Group marriages are pending due to lack of proposals | सामुहिक विवाह सोहळय़ाचे प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित

सामुहिक विवाह सोहळय़ाचे प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित

Next

वाशिम: अमरावती विभागातील बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांत मिळून मागील चार वर्षांतील सामुहिक विवाह सोहळय़ांचे १ हजार ६00 च्यावर प्रस्ताव त्रुटीअभावी प्रलंबित आहेत. या संदर्भात तिन्ही जिल्ह्यांच्या समाज कल्याण कार्यालयाकडून संबंधित स्वयंसेवी संस्थांकडे दुरुस्तीचे पत्र सादर केले असले तरी, अद्यापही अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याची दुरुस्ती करून सुधारीत प्रस्ताव पाठविले नाहीत.
समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, आणि भटक्या विमुक्त जातींमधील उपवर मुलामुलींच्या विवाह सोहळय़ांसाठी प्रति जोडपे १0 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, तसेच या सोहळय़ांचे आयोजन करणार्‍या स्वयंसेवी अथवा सामाजिक संस्थांनाही प्रोत्साहनपर प्रती जोडपे २ हजार रुपयांचे अनुदान समाज कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येते. या योजने अंतर्गत बुलडाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात मागील चार वर्षांत अर्थात २0१२ पासून तीन हजाराच्यावर सामुहिक विवाह सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले. मात्र, त्यातील १ हजार सहाशेहून अधिक प्रस्ताव त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ७४६, तर बुलडाणा जिल्ह्यातील ५१९ विवाह सोहळय़ांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. विवाह सोहळय़ाचे आयोजन करताना समाविष्ट जोडप्यांचे प्रथम विवाहाचे दाखले न देणे, जोडप्यांचे आधार कार्ड अथवा ओळखपत्र सादर न करणे आणि बँकेचा खाते क्रमांक सादर न करणे आदी कारणांमुळे हे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडून कळले. आता या संस्थांनी सुधारीत प्रस्तावच शासनाकडे पाठविले नसल्याने त्यांनी आयोजित केलेल्या विवाह सोहळय़ात सहभागी झालेली सर्व जोडपी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, यावर्षी सन २0१६-१७ साठी अमरावती विभागात अनुसूचित जातीच्या सामुहिक विवाह सोहळय़ांसाठी ४१ लाख २२ हजार रुपयांचा, तर भटक्या विमुक्त जातीच्या विवाह सोहळय़ांसाठी ३ लाख २२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Group marriages are pending due to lack of proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.