आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणासाठी संस्थांचा वाढता पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:48 PM2019-03-03T15:48:20+5:302019-03-03T15:48:46+5:30
मानोरा (वाशिम) : सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून चांगला नागरिक घडविण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार वाढतच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून चांगला नागरिक घडविण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार वाढतच आहे. मंगरुळपीर आणि रिसोडमधील काही शैक्षणिक संस्थांनी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरविले असतानाच आता मानोरा येथील जे. एस. पब्लिक स्कूलनेही आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचे ठरविले आहे. संस्थाध्यक्ष अरूण राठोड यांनी हा निर्णय घेतला आहे.
देशाच्या सीमेवर देशवासियांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणाºया आणि प्रसंगी प्राणाचे बलिदान देणारे शूर सैनिक कित्येक महिने, वर्ष कुटूंबापासून दूरच राहतात. कधीकधी सीमेवर देशाचे रक्षण करतानाच त्यांना वीरगती प्राप्त होते. दुसरीकडे त्यांच्या हयातीत आणि पश्चातही त्यांच्या कुटुंबाला एकाकी जीवन जगावे लागते. अशा वीर जवानांचा यथोचीत सन्मान व्हावा, त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून वाशिम जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या आहेत. आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रिसोड तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, मंगरुळपीर येथील अभ्यासा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतल्यानंतर आता मानोरा येथील जे. एस. पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अरूण राठोड आणि सचिव प्रा. अनिल चव्हाण यांनीही आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अमलबजावणी होणार असून, याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुकवर प्रसार करण्यासह सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात येणार असल्याचे अरूण राठोड यांनी सांगितले.