पाेहरादेवी परिसरात बहरतेय मोहरीचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:53+5:302021-01-18T04:36:53+5:30
मानोरा : तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी परिसरात मोहरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, मोहरीच्या ...
मानोरा : तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी परिसरात मोहरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, मोहरीच्या पिवळ्या फुलांनी बहरलेले शिवार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मसालावर्गीय पिकांवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मानोरा तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या अनियमिततेमुळे सतत संकटात सापडत आहे. नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीकही मोठ्या प्रमाणात येणारा खर्च व बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना आतबट्ट्यात आणत असल्याने शेतकरी सोयाबीन आणि तूर या कमी जोखमीच्या पिकाकडे मागील अनेक वर्षांपासून वळल्याचे दिसत आहे.
त्यात प्रारंभापासून तर काढणीपर्यंत निसर्गाची साथ मिळाली तरच सोयाबीन आणि तुरीचे पीक घरी येण्याची शाश्वती असते. यावर्षी काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. अशात काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन भाजीपाला, फळपिकांचा आधार घेत आहेत, तर पोहरादेवी परिसरातील शेतकऱ्यांचा मोहरी पिकाकडे कल वाढला आहे. पोहरादेवी-धानोरा या मार्गावरील शिवारात मोठ्या प्रमाणात मोहरी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना कमी खर्च करावा लागतो. शिवाय या पिकाला वन्यप्राण्यांचा धोकाही नसतो. त्यामुळेच शेतकरी या पिकाचा आधार घेत आहेत.