वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; सेवेसाठी खासगी डॉक्टरांकडे धाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:45 AM2020-09-09T11:45:30+5:302020-09-09T11:45:35+5:30
उपचारासाठी ‘कॉल आॅन’स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या निर्णयापर्यंत जिल्हा प्रशासन येऊन ठेपले आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, भविष्यात धावपळ होऊ नये म्हणून अतिजोखीम गटातील रुग्णांवरील उपचारासाठी ‘कॉल आॅन’स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या निर्णयापर्यंत जिल्हा प्रशासन येऊन ठेपले आहे. त्याच अनुषंगाने खासगी डॉक्टरांशी आरोग्य यंत्रणेची चर्चा सुरू आहे.
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात सुरूवातीच्या सात दिवसातच नव्याने ४९० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ११ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असून, भविष्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा स्फोट झाला आणि अतिजोखीम गटातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टिने प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू आहे. होम आयसोलेशनचा पर्याय असावा असा सुर डॉक्टरांमधून उमटत आहे.
भविष्यात कोरोनाबाधितांची आणि त्यातही आॅक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली तर ऐनवेळी गैरसोय नको म्हणून आतापासूनच नियोजन केले जात आहे. कोरोना रुग्णांना ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत आयएमएशी चर्चा करावी, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहेत. भविष्यात गरज पडली तर मी पण आयएमएशी यासंदर्भात चर्चा करेल.
- ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी,