भावना गवळींच्या संपत्तीत दीड पटीने वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:22 PM2019-03-26T14:22:08+5:302019-03-26T14:22:35+5:30
पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार भावना गवळी यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांमध्ये दीड पटीने वाढ झाली आहे.
वाशिम : वाशिम व यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाचे मिळून सलग चार वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार भावना गवळी यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांमध्ये दीड पटीने वाढ झाली आहे. अर्थातच यात जमिनीच्या दरांमध्ये पाच वर्षांत झालेल्या दरवाढीचा मोठा वाटा आहे. सध्या त्यांच्या नावावर एकूण ९ कोटी ६८ लाख ७३ हजार १८९ रुपये मूल्य असलेली संपत्ती आहे.
खासदार भावना गवळी यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. यात त्यांनी स्वत:च्या नावावर एकूण १ कोटी ५७ लाख १५ हजार २७५ रुपये मूल्याची चल संपत्ती दर्शविली आहे. २०१४ मध्ये नामनिर्देशनपत्र भरताना त्यांनी दर्शविलेल्या संपत्तीनुसार स्वत:च्या नावावर एकूण ६ कोटी ०८ लाख ८६ हजार ०४० रुपये मूल्य असलेली चल आणि अचल संपत्ती होती. याचाच अर्थ पाच वर्षांत त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ३ कोटी ५९ लाख ८७ हजार १४९ रुपयांनी वाढ झाली आहे. यात सर्वात मोठा वाटा हा अचल संपत्तीचा आहे. अचल संपत्तीमध्ये शेती, बिगरशेती आणि व्यावसायिक जमीनींचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये जमिनीचे बाजारमूल्य आणि आताच्या बाजारमूल्याची तुलना केली असता खासदार भावना गवळी यांची संपत्ती वाढल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे एकूण २४ लाख ७० हजार ७८० रुपये रोकड आहे. खासदारांच्या नावे बँकेत ६४ लाख ३१ हजार ८८४ जमा असल्याचे दर्शविले आहे. बँक, बाँड आणि विम्यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक १० लाख २७ हजार ७०० रुपये आहेत. स्वत:कडे २00 ग्रॅम सोने तर १२०० ग्रॅम चांदी याची गुंतवणूक ७ लाख एक हजार ५२० आहे.
सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे एकूण ११ लाख ३४ हजार ९६४ रुपये रोकड होती. खासदारांच्या नावे बँकेत ८५ लाख ८८ हजार ५३७ जमा होते. बँक, बाँड आणि विम्यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक ७ लाख ६६ हजार ९५८ रुपये होते. तसेच २00 ग्रॅम सोने तर १२०० ग्रॅम चांदी त्यांच्याजवळ त्यावेळी होती.
७३ लाखाचे कर्ज
खासदार भावना गवळी यांच्या नावावर ७३ लाख १६ हजार २५० बँकाचे कर्ज आहे
५० लाख ८७ हजाराची वाहने
खासदार भावना गवळी यांचेकडे तीन वाहने असून यामध्ये हुंडाई क्रेटा, टोयाटो इनोव्हा, हुंडाई वणार्चा समावेश आहे. याची अनुक्रमे किंमत १७ लाख ५० हजार, २४ लाख ३७ हजार, ९ लाख असे एकूण ५० लाख ८७ हजार रुपयांचे वाहने आहेत.