पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जीएसटीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:08 PM2017-10-26T16:08:26+5:302017-10-26T16:09:28+5:30
मालेगाव: शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पाद्वारे नळ योजनेतून पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि त्याचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले; परंतु आता जीएसटीमुळे खर्चात वाढ होणार असल्याने संबंधित कंत्राटदार कं पनीला नव्याने अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करावा लागणार असल्याने या योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याही मालेगाव शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
मालेगाव शहराची लोकसंख्या ३० हजारांच्या घरात असून, या शहराला कुरळा आणि सुकांडा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु या धरणाचा पाणीसाठा वर्षभर पुरत नसल्याने शहरातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मालेगाव नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पावरून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि संबंधित कंत्राटदाराकडून या प्रकल्पावरून नळ योजनेद्वारे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनसह जलकुंभाच्या उभारणीसाठी सर्व्हेही करण्यात आला आणि सदर योजनेचे अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाकड मान्यतेसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे या योजनेचे काम आता लवकर सुरू होणार असे वाटू लागले; परंतु शासनाने जीएसटी लागू केल्यानंतर या कामावरील खर्चात वाढ होणार असून, सदर कंत्राटदाराला नव्याने अंदात पत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यामुळे या कामाला आणखी विलंब लागणार असल्याने मालेगाववासियांना यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.