कारमेलच्या मुख्याध्यापकाविरोधात पालक संतप्त
By Admin | Published: September 5, 2015 01:38 AM2015-09-05T01:38:48+5:302015-09-05T01:38:48+5:30
अमरावतीच्या पथकाने केली चौकशी; गुरूवारपर्यंंत निर्णयाची दिली ग्वाही.
वाशिम : येथील माऊंट कारमेल शाळेतील मुख्याध्यापकाच्या उद्धट व अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात ४ सप्टेंबर रोजी संतप्त झालेले शेकडो पालक एकत्र येऊन मुख्याध्यापकाच्या बदलीची मागणी अमरावतीच्या त्रिसदस्य शिष्टमंडळाकडे केली. शिष्टमंडळासोबत तब्बल दोन ते तीन तास ह्यमॅरेथॉनह्ण चर्चा पार पडली.
इ.स. १९९८ साली या शाळेची मुहूर्तमेढ वाशिम शहरामध्ये रोवल्या गेली. माऊंट कारमेल शाळा जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित शाळा म्हणून समोर आली आहे. या शाळेमधील शिस्त व शिक्षण याचा दर्जा चांगला असल्यामुळे शहर व परिसरातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी, अधिकारी यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्तींची मुले शिक्षण घेतात. गेल्या १६ वर्षांच्या कार्यकाळामध्ये फादर मॅथ्यु असो किंवा इतर फादर असो, या सर्वांंंनी प्रामाणिकपणे सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना आपल्या परिवारातील सदस्य समजून सर्वांंंसोबत प्रेमाची व आदराची वागणूक दिली. आजपर्यंतच्या सर्वच फादर यांनी आपल्या शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावर नेऊन ठेवण्यात मोलाचे योगदान दिले, हे सर्वश्रुत आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी फादर मॅथ्यु यांची बदली झाली. त्यांचे जागेवर फादर संजय वानखडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. आपला पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच वानखडे यांचा कारभार वादग्रस्त ठरला. वादग्रस्त ठरलेले वानखडे यांनी शिक्षकांवर केलेल्या अत्याचाराची माहिती प्रसिद्धीमाध्यमामार्फत पालकांना मिळाली. केवळ या माहितीच्या आधारावर शेकडो पालकांनी सकाळी ९ वाजेपासून माऊंट कारमेल शाळेकडे धाव घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुणाचेही नेतृत्व नसताना एवढय़ा मोठय़ा संख्येत पालक एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्याध्यापक वानखडे व इतर शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांच्यावर गेल्या दोन महिन्यात झालेल्या अत्याचाराला हळूहळू वाचा फुटायला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक-दोन नव्हे तर शेकडो पालकांनी आपले मन मोकळे करून वानखडे यांनी कशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली. याचा इत्यंभुत पाढाच अमरावती येथून आलेल्या शिष्टमंडळासमोर कथन केला. तथापि, संतप्त पालकांनी शैक्षणिक वातावरणात बाधा आणणार्या मुख्याध्यापक संजय वानखडे, शिक्षक सोजी जॉय, जयंत बर्डेकर व एका सुरक्षारक्षकावर कार्यवाही करून त्यांची बदली करा, अशी मागणी केली.