खरीप पेरणीपूर्व तयारीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:33+5:302021-05-11T04:43:33+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबतचा संदेश देण्यात आला तसेच कृषी अनुसंधान परिषदेचे गीत लावण्यात आले. ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबतचा संदेश देण्यात आला तसेच कृषी अनुसंधान परिषदेचे गीत लावण्यात आले. सर्वप्रथम ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे डॉ रवींद्र काळे यांनी करून कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या वतीने तंत्रज्ञान प्रचार व प्रसाराचे उपक्रम व सेवाबाबतची माहिती देऊन ग्रामीण भागातील नवयुवक शेतीमध्ये येत आहे, ही शेती उद्योगाकरिता सकारात्मक बाब असून शेती व शेती निगडित उद्योगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक मृद विश्लेषक मिलिंद कांबळे यांनी एकात्मिक खत पद्धतीमध्ये जैविक सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर या विषयावर माहिती देऊन शास्त्रीय पद्धतीने मातीचा नमुना काढण्याची पद्धत व माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रेचा वापर याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अंती शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संगणक तज्ज्ञ एस. आर. बावस्कर यांनी मानले.
..........................
हळद लागवडीबाबत मार्गदर्शन
फळबाग तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी हळद लागवड व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबीवर मार्गदर्शन करताना हळद पिकाकरिता जमिनीचा प्रकार, हळद बेणे प्रक्रिया, हळदीचे विविध वाण व गुणधर्म, रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर आणि लागवडीच्या वेळेस द्यावयाची खतमात्रा या बाबीवर सविस्तर सादरीकरण करून शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.
..........................
उगवणशक्ती तपासणीबाबत मार्गदर्शन
कृषी विस्तार तज्ज्ञ एस. के. देशमुख यांनी खरीप पीक लागवडीचे प्रमुख सूत्रांमध्ये घरगुती पद्धतीने उगवणशक्ती तपासणी, बियाणे प्रक्रिया, वाणांची निवड, पाऊसमान, बियाणे मात्रा, रासायनिक खत मात्रा व तणनाशकांचा वापर याबाबत सादरीकरण केले व यापुढे बोलताना त्यांनी सोयाबीनचे क्षेत्र कमी करून इतर पिके जसे उडीद, मूग, ज्वारी, मका, आदी पिकांखालील क्षेत्र वाढविण्याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गाव पातळीवर प्रचार व प्रसार करणार असल्याचे सांगितले. स्नेहदीप शेतकरी उत्पादक कंपनीचे सहकारी दीपक कापसे यांनी अनसिंग भागात हळद पिकाचे क्षेत्र, त्यातील अडचणी व पीक उत्पादनाकरिता लागणाऱ्या बाबी यावर माहिती दिली.