कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत हिवरा रोहिला येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:35+5:302021-06-28T04:27:35+5:30
कृषी संजीवनी मोहिमेत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमिनीचे आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्राचा ...
कृषी संजीवनी मोहिमेत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमिनीचे आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्राचा वापर, विकेल ते पिकेल अभियान, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान प्रसार करणे, रिसोर्स बँक स्थापनबाबत मार्गदर्शन, खरीप पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीबाबत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठाचे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे, गाव बैठका, शिवार भेटी, वेबीनार व शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करून कमी खर्चात उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जि. प. सदस्य दिलीपराव देशमुख, पं. स. सदस्य महादेवराव सोळंके, सरपंच गजाननराव देशमुख, कृषी विकास अधिकारी बंडगर, पीकेव्हीचे वाशिम येथील शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी, उमेश राठोड, वाशिम पं.स.चे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषी पर्यवेक्षक सुनीलदत्त वाळूकर, कृषी सहायक भागवत देशमुख व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
----------------
जि.प. अध्यक्षांचे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
हिवरा रोहिला येथे आयोजित कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी अध्यक्षीय भाषणात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कृषी संजीवनी मोहिमेचा उद्देश याबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करतानाच सोयाबीन उत्पादन वाढीसाठी बीबीएफ कसे उपयुक्त ठरेल त्याची माहिती दिली तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.