‘व्हॉटसअॅप ग्रुप’वरुन मशरुम उत्पादनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:08 PM2019-03-03T16:08:38+5:302019-03-03T16:09:02+5:30
लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मशरुम उत्पादकांनी ‘व्हॉटसअॅप ग्रुप’ तयार करून मशरूम उत्पादनातील विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन सुरु केले आहे.
वाशिम : मागील चार पाच वर्षांत शेतकरी व बेरोजगार युवकांचा मशरूम उत्पादनाकडे कल वाढला आहे. तथापि पुरेशी माहिती नसल्याने त्यांना परिश्रम करूनही अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मशरुम उत्पादकांनी ‘व्हॉटसअॅप ग्रुप’ तयार करून मशरूम उत्पादनातील विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन सुरु केले आहे.
सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते. मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो. भारतात मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे व त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बटन मशरूम, शिंपला मशरूम, अशा मशरूमच्या काही जाती आहेत. वाशिम जिल्ह्यातही अनेक शेतकरी व बेरोजगार युवक मशरूम शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, मशरूम उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, उत्पादनाची पद्धत, बाजारपेठ आदिंची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाशिममधील काही मशरूम उत्पादकांनी ‘व्हॉटसअॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे मार्गदर्शन सुरू केले असून, या ग्रुपमध्ये वाशिम जिल्ह्याबाहेरच्याही तज्ज्ञ मशरूम उत्पादकांसह एकूण ६० लोकांचा समावेश आहे.