शेतीच्या बांधावरच सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:05+5:302021-03-01T04:49:05+5:30

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील ...

Guidance on Organic Fertilizer Production on Agricultural Dams | शेतीच्या बांधावरच सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन

शेतीच्या बांधावरच सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन

Next

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी तुरीची, हरभऱ्याची खुंटे, अवशेष शेतात जमा करून ते पेटवत शेत मोकळे करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतीचे नुकसान होते. काडीकचरा जाळल्यामुळे परिसरात धूर पसरून पर्यावरणावर परिणाम होतो. शिवाय यामुळे जंगलात वणवा पेटण्याची भिती असते आणि शेतजमिनीमधील उपयुक्त जीवाणूचा नाशही होतो. ही बाब लक्षात घेत धूरमुक्त अभियानांतर्गत याच काडीकचऱ्यापासून उपयुक्त आणि विनाखर्च सेंद्रीय खत निर्मितीबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंटे, भुईमुगाचे काड , अवशेष न जाळता त्यापासून सेंद्रीय खत कसे तयार करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

---------

काडीकचऱ्यापासून खत तयार करण्याची पद्धती

शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंट, इतर पिकांचा काडीकचरा जमा करून तो शेताच्या बांधावर ३ फूट उंचीपर्यंत बांधाच्या रुंदीप्रमाणे पसरवावा, बांधावर जेवढ्या लांबीत शक्य होईल, तेवढ्या प्रमाणात हा कचरा पसरवून त्यावर शेतामधील माती टाकावी. पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यानंतर तो कचरा चांगला कुजतो आणि रब्बी हंगामापर्यंत त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत तयार होते. या खताच्या वापरामुळे जमिनीचा कस आणि पोत सुधारून जमिनीची उत्पादन क्षमता, पाणी धारण क्षमताही वाढते. शिवाय जीवांणूची संख्या वाढून पिकांची रोग, कीड प्रतिकार क्षमताही वाढते. या खताचा रब्बी पिकांसाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचा कीड व बुरशीनाशकचा वापरही कमी होऊ शकतो.

------

कोट: रब्बी पिकांचे शेतामधील अवशेष शेतकऱ्यांनी न जाळता त्यापासून शेताच्या बांधावरच ढीग करून त्यावर माती टाकत सेेंद्रीय खत तयार करावे किंवा रोटाव्हेटरने हे अवशेष शेतजमिनीत मिसळल्यास शेतजमिनीचा पोत आणि कस सुधारण्यास मदत होऊन पीक उत्पादन वाढू शकते.

-शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Guidance on Organic Fertilizer Production on Agricultural Dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.